हिंदुस्थानी संघाला सोलून काढायला सुरुवात केली. कसोटीत अव्वल असलेल्या हिंदुस्थानी फलंदाजांची ही शरणागती कुणालाच पटलेली नाही.
त्यातच कमकुवत भासणाऱया न्यूझीलंडसमोर हिंदुस्थानी दिग्गज धारातीर्थी पडल्याचे दुःख अधिक झालेय. पण कसोटीत पहिल्या डावात माती खाणाऱया संघानेही प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजलेय. असे दुर्मिळ पराक्रम कसोटी इतिहासात अनेकदा घडलेत. ज्या संघांनी लाजिरवाण्या कामगिरीनंतरही संघर्ष केला, झुंज दिली ते यश मिळवण्यात यशस्वी ठरलेत. जसं कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती, तस्संच.
कुणाला खोटे वाटेल, पण तब्बल 137 वर्षांपूर्वी इंग्लंडचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाने अवघ्या 45 धावा गुंडाळला होता. तरीही इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला होता. ही गोष्ट खूप जुनी असली तरी क्रिकेटमध्ये अशक्य असे काही नाही. पण पाच वर्षांपूर्वी इंग्लंडने या पराक्रमाची पुनरावृत्ती केली होती. 2019 मध्ये ‘अॅशेस’ मालिकेत ऑस्ट्रेलियाने लीड्स कसोटीत इंग्लंडचा 67 धावांत गाशा गुंडाळला होता तरीही इंग्लंडने झुंजार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या एका विकेटने पराभव करत खळबळ माजवली होती. एवढेच नव्हे तर या लढतीच्या महिनाभर आधी आयर्लंडनेही इंग्लंडचा चक्क 85 धावांत फडशा पाडला होता. या धक्कादायक घसरगुंडीनंतरही इंग्लंडने आयर्लंडला धूळ चारण्याचा पराक्रम केला होता.
इंग्लंडने कसोटी इतिहासात अनेकदा पहिल्या डावातील अपयश धुऊन काढताना अनेक कसोटी जिंकल्या आहेत. मात्र अशीच कामगिरी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेनेही केलीय. ऑस्ट्रेलियाने 142 वर्षांपूर्वी इंग्लंडच्याच विरुद्ध हा डाव साधला होता. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 63 धावांत गुंडाळले होते, पण ऑस्ट्रेलियाने कसोटात मुसंडी मारताना इंग्लंडचे दोन्ही डाव स्वस्तात गुंडाळत अवघ्या 7 धावांनी सामना जिंकला होता. 2011 साली केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकन संघाला 96 धावांतच संपवले होते. तेव्हा 188 धावांची आघाडी घेणाऱया ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आफ्रिकन गोलंदाजांनी अवघ्या 47 धावांत गुंडाळला आणि 236 धावांचे आव्हान अवघ्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज गाठले. 2012 साली दुबई कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानचा 99 धावांत खुर्दा पाडला होता. त्यानंतरही पाकिस्तानने इंग्लंडला हरवण्याची करामत केली. म्हणजेच कसोटी संघर्ष करणारा संघ लज्जास्पद घसरगुंडीनंतरही अभिमानास्पद कामगिरी करू शकतो, हे इतिहास सांगतोय. हिंदुस्थानी संघांकडूनही अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.
…तेव्हा न्यूझीलंडनेही हिंदुस्थानला नमवले होते
22 वर्षांपूर्वी हॅमिल्टन कसोटीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 94 धावांत खुर्दा पाडला होता. न्यूझीलंडनेही हिंदुस्थानला 99 धावांत गुंडाळले होते. म्हणजेच कसोटीत नीचांक न्यूझीलंडचा होता, पण या कसोटीत बाजी न्यूझीलंडनेच मारली होती.