गरोदरपणात वाढलेलं वजन बाळाच्या जन्मानंतर लगेचच कमी होत नाही. बहुतांश महिला प्रसूतीनंतर जाड होतात. बॉलिवूडमधल्या अभिनेत्री अनेक ट्रिटमेंट्स आणि उपचार घेऊन त्यांचं वजन वेगानं कमी करतात. सोनम कपूर, करिना कपूर, आलिया भट यांनी प्रसूतीनंतर लगेचच वजन कमी केलं. मात्र या उलट ऐश्वर्या रायनं केलं. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या सामान्य स्त्रियांसारखी वजन वाढलेल्या अवस्थेतच होती. त्यावरून तिच्यावर टीकाही झाली.
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली, तेव्हा एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं बातमीचं शीर्षक दिलं होतं, ‘It is her DUTY to look good and FIT.’ (सुंदर आणि तंदुरूस्त दिसणं हे तिचं कर्तव्य आहे.) इतकी टीका होऊनही ऐश्वर्यानं तिची भूमिका बदलली नाही. ‘अल जझिरा’ला ऑक्टोबर 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं त्याबद्दल खुलासा केला होता. मुलाखत घेणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार डेव्हिड फॉरेस्ट यांनी तिला विचारलं होतं, की तुमच्या वजनावरून बातम्यांची शीर्षकं दिली जात आहेत, तर तसं का? त्यावर ऐश्वर्यानं हसूनच सांगितलं की, ‘मीदेखील अजून हे समजू शकलेले नाही, की त्यावर चर्चा का होते आहे. मला वाटतं त्यावर चर्चा व्हायला नको. कारण ते तितकं महत्त्वाचं नाही.’
ऐश्वर्याने सांगितलं होतं, ‘माझ्या शरीराला नैसर्गिकरित्याच तो आकार प्राप्त झाला होता. वजन वाढल्यामुळे असेल किंवा पाणी साचल्यामुळे असेल, जे होतं ते नैसर्गिक होतं. तशा शरीरासोबत मला आरामदायी वाटत होतं, त्यामुळे मी जशी होते, तशीच राहिले. ती खूप मोठी गोष्ट होती असं मला वाटत नाही. त्यामुळेच ती गोष्ट मी कधी लपवली नाही आणि त्याबाबत काही वेगळं पाऊल उचललंही नाही. सध्याच्या काळात काहीही असाध्य नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे रातोरात वजन कमी करणं शक्य होऊ शकतं, पण मी तो पर्याय निवडला नाही. कारण मला वजनाबाबत काहीच तक्रार नव्हती. माझ्या मुलीसोबत मी खरं आणि सामान्य आयुष्य जगत होते.’
अनेक महिलांनी तिचे आभार मानले होते. स्वतःच्या आहे त्या शरीराबाबत कम्फर्टेबल वाटण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं महिलांनी तिला सांगितलं. ऐश्वर्या म्हणते की त्या काळात तिला केवळ साधं व खरं आयुष्य जगायचं होतं. तिचं हे बोलणं अनेक महिलांना प्रेरणा देऊ शकतं.