बांगलादेश हे आपले शेजारील राष्ट्र. सध्या हा देश संक्रमणावस्थेतून जात आहे. देशातील लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्यात आले असून पदच्युत पंतप्रधान शेख हसीना देशोदेशी शरणागतीसाठी फिरत आहेत.
त्यांच्या अटकेचे आदेश बांगलादेश मधील न्यायालयाने काढले आहेत.
दुसरीकडे हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलेले मोहम्मद युनूस यांच्या सरकारची वाटचाल पाकिस्तानच्या विचारधारेच्या दिशेने सुरू झाली आहे. संपूर्ण बांगलादेशमध्ये या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.
मोहम्मद युनूस यांच्या सल्लागार मंडळाने देशातील आठ राष्ट्रीय सुट्ट्या रद्द करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. हे सर्व राष्ट्रीय सण बांगलादेशची निर्मिती, त्यासाठी झालेला मुक्तिसंग्राम यांच्या स्मृती प्रित्यर्थ साजरे करण्यात येतात. या स्मृती पुसून टाकण्याचाच प्रयत्न युनूस यांच्या सरकारने केला आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत सूचना सरकारकडून करण्यात आलेली नसली तरी मोहम्मद युनूस यांच्या व्हेरिफाइड फेसबुक अकाउंट वरून तशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे बांगलादेशच्या विविध सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
असा आहे बांगलादेशचा इतिहास
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची फाळणी करण्यात आली. हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान असे दोन देश निर्माण करण्यात आले. भारताचे पूर्व बाजूस असलेला पूर्व पाकिस्तान ( बांगलादेश) आणि पश्चिम बाजूस असलेला पश्चिम पाकिस्तान असे हे एकच राष्ट्र होते. पाकिस्तानची भाषा आणि संस्कृती बांगला ही मातृभाषा असलेल्या पूर्व पाकिस्तानच्या लोकांना मान्य नव्हती आणि त्यामुळे बांगलादेश मुक्तिसंग्राम सुरू झाला.
पाकिस्तानी लष्कराने हा मुक्तिसंग्राम चीरडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र वंग बंधू मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी जनतेने तीव्र लढा दिला. आणि भारताच्या हस्तक्षेपाने 1971 चे युद्ध झाले आणि बांगलादेशी निर्मिती झाली. या देशाच्या निर्मितीसाठी बांगलादेशी जनतेने प्रचंड हाल सोसले आहेत.
स्मृती पुसून काढण्याचा प्रयत्न
मात्र या साऱ्या स्मृतीच पुसून काढण्याचा युनूस सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुजीबुर रेहमान यांनी बांगलादेशी जनतेला एकत्रित आणले तो दिवस सात मार्च, मुजिबूर रहमान आणि यांच्या परिवाराची हत्या झाली तो दिवस 15 ऑगस्ट, 17 मार्च रोजी असलेली रहमान जयंती आणि चार नोव्हेंबर हा बांगलादेशी राज्यघटना दिवस तसेच अन्य दिवस जे बांगलादेशच्या बंगाली अस्मितेशी संबंधित आहेत ते साजरे करण्यात येत असत. मात्र ते युनुस सरकारने रद्द केले आहेत.
मुजीबुर रहमान यांच्या आठवणी आणि बांगलादेशी मुक्तिसंग्रामाच्या आठवणीने पुसून काढण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका अवामी लीगने केली आहे. समाजाच्या सर्व स्तरातून युनुस सरकारच्या या निर्णयांचा निषेध करण्यात येत आहे. हे निर्णय बांगलादेश ला 60 वर्षे मागे नेणारे आहेत आणि पाकिस्तानशी साधर्म्य सांगणारे असल्याचा दावा करण्यात येतो आहे